मुंबई : सध्याची धकाधकीची लाइफस्टाइल, खाण्या-पिण्याच्या सवयी, प्रदूषण, स्ट्रेस आणि काही आनुवंशिक घटक यांचा परिणाम केसांवर होताना दिसतो. अनेक पुरुषांना फार कमी वयात टक्कल पडत आहे, तर अनेक स्त्रियादेखील केसांच्या विविध समस्यांनी त्रस्त आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून बाजारात अनेक प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर आणि हेअर ऑइल्स उपलब्ध आहेत. सध्या सोशल मीडियावर असंच एक हेअर ऑइल खूप व्हायरल होत आहे. ‘आदिवासी हेअर ऑइल’ असं नाव असलेलं हे तेल कर्नाटकातल्या आदिवासी भागातून आलं आहे. कॉमेडियन भारती सिंग, कोरिओग्राफर फराह खान, यूट्युबर एल्विश यादव यांसारख्या अनेक सेलेब्रिटी-एन्फ्लुएन्सर्सनी या तेलाची जाहिरात केली आहे. हे तेल कितपत प्रभावी आहे आणि त्यात कोणती औषधं आहेत याबाबत सविस्तर माहिती घेऊ या.
पश्चिम आणि दक्षिण भारतातल्या जंगलात (कर्नाटक) हक्की पिक्की आदिवासी समुदाय आहे. ही कर्नाटकातली अनुसूचित जमात असून, ऐतिहासिकदृष्ट्या राणा प्रताप सिंह यांच्याशी संबंधित मानली जाते. हे आदिवासी प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करायचे. वन्यजीव कायद्यामुळे शिकारीवर बंदी आली आहे. त्यामुळे आता ते नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या अनेक गोष्टींची विक्री करत आहेत. ‘आदिवासी हेअर ऑइल’ त्यापैकीच एक आहे.
आदिवासी हेअर ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर या तेलाची वैशिष्ट्यं आणि काही फायदे नमूद केलेले आहेत. त्यानुसार, कर्नाटकातल्या आदिवासींच्या पाचपेक्षा जास्त पिढ्यांपासून हे तेल बनवलं जात आहे. या तेलात पॅराबिन, सिलिकॉन किंवा पॅराफिन हे रासायनिक घटक अजिबात नाहीत. कोंडा दूर करण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी, टक्कल पडलेल्या ठिकाणचे केस वाढवण्यासाठी आणि केसगळती थांबवण्यासाठी हे तेल उपयुक्त आहे. 250, 500, 1000 मिली तेलाची किंमत अनुक्रमे 999, 1499 आणि 3000 रुपये आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या तेलाची जाहिरात केल्याने ते नक्कीच प्रभावी असेल, असा अनेकांना विश्वास आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
हेअर ऑइल विक्रेत्यांचे केस लांब आणि चमकदार असतील तर यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. हे तेल कर्नाटकातल्या हक्की पिक्की समुदायाने बनवलं आहे. हे लोक पूर्वीपासून निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. त्यामुळे आनुवंशिकता, त्यांचा आहार आणि वातावरणामुळेही त्यांचे केस काळे, लांब आणि दाट असू शकतात. तिथल्या लोकांची जीवनशैली शहरी जीवनशैलीपेक्षा खूपच वेगळी आहे. तिथे अजिबात प्रदूषण नाही. परिणामी नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्याने त्यांच्या केसांवर फार लवकर सकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या केसांच्या चांगल्या स्थितीला फक्त तेल कारणीभूत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे.
पवईतल्या ‘द इटर्नल क्लिनिक’मधले कन्सल्टंट डरमॅटोलॉजिस्ट आणि हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सय्यद अजरा टी हमीद यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या कपाळावरचे किंवा कानांजवळचे केस गळण्यास सुरुवात होऊन टक्कल पडणं ही टक्कल पडण्याच्या प्रक्रियेतली सर्वांत सामान्य स्थिती आहे. टक्कल पडण्याचं योग्य कारण शोधणं आणि त्यावर उपचार करणं महत्त्वाचं आहे. फक्त तेल वापरून टकलावर केस येऊ शकत नाहीत.
डॉ. अजरा यांच्या मते, आदिवासी हेअर ऑइलमध्ये काही आयुर्वेदिक गुणधर्म असले, तरी त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांना शास्त्रीय आधार नाही. या तेलात आवळा आहे. तो केसांच्या वाढीसाठी उपयुक्त मानला जातो. कडुनिंबाच्या पानांमध्ये ॲझाडिरॅक्टिन आणि निम्बिडिन हे अल्कलॉइड्स असतात. त्यात दाहविरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. त्यामुळे टाळूच्या संसर्गास प्रतिबंध होऊ शकतो. सध्याच्या काळात अनेक जण ‘हर्बल’ हे नाव वाचताच एखाद्या प्रॉडक्टकडे आकर्षित होतात. हे चुकीचं आहे.
गुरुग्रामच्या सीके बिर्ला हॉस्पिटलमधले स्कीन डिसिज एक्स्पर्ट आणि हेअर केअर एक्स्पर्ट डॉ. रुबेन भसीन पासी याचं म्हणणं आहे, की तुमच्या केसांमधला कोंडा हे केसगळतीचं कारण असेल तर तुम्ही कोंडा बरा करू शकता. यामध्ये हेअर ऑइल मदत करणार नाही. हेअर ऑइल आणि इतर उपचार तुमचे केस निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात; पण केसांच्या छिद्रांमध्ये नवीन केस उगवण्यास मदत करणार नाहीत.
डॉ. पासी म्हणाले, “केसांना सॉफ्टनेस देणं, हा केसांना तेल लावण्याचा मुख्य उद्देश आहे. त्याचा कोंड्याशी काहीही संबंध नाही. उलट एखाद्या व्यक्तीने फार जास्त तेल लावलं, तर तिच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. आदिवासी हेअर ऑइल उत्पादकांचं म्हणणं आहे, की चांगल्या परिणामांसाठी दिवसातून दोनदा तेल लावलं पाहिजे; पण शास्त्रीयदृष्ट्या दिवसातून दोनदा तेल लावल्यास कोंड्याची समस्या वाढू शकते. कारण, ओलसर वातावरणात फंगस आणि बॅक्टेरिया फार लवकर वाढतात.”
आदिवासी हेअर ऑइलमधल्या घटकांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. सेलेब्रिटी आणि एन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यानुसार त्याचा वापर करणं योग्य नाही. केस गळणं, कोंडा आणि केसांच्या इतर समस्यांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.